मराठा आरक्षणासाठी तिप्पेहळ्ळी येथे मशाल मोर्चा; नेत्यांना गावबंदी
जतवार्ता न्यूज नेटवर्क: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देत जत तालुक्यातील तिप्पेहळ्ळी येथे मशाल मोर्चा काढून आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. तसेच साखळी उपोषण सुरू करणार असल्याची माहिती तिप्पेहळ्ळी येथील मराठा बांधवांनी दिली. यावेळी तिप्पेहळ्ळी येथील सर्व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी तिप्पेहळ्ळी येथे राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र, फडणवीस, छगन भुजबळ, नारायण राणे व सदावर्ते यांचा जाहीर निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. सोमवार (दि.३०) रोजी तिप्पेहळ्ळी ते जत मोटारसायकल रॅली काढून जत तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय व पोलीस स्टेशन यांना साखळी उपोषणा संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. तसेच मंगळवार (दि.३१) रोजी सकाळी आठ वाजले पासून तिप्पेहळ्ळी येथील हनुमान मंदिर येथे साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती तिप्पेहळ्ळी येथील मराठा बांधवांनी दिली.