जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंती साजरी



जतवार्ता न्यूज नेटवर्क:-  जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस शंकरराव वगरे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी तुकाराम माळी, उत्तमराव महारणूर,रविंद्र सोलनकर,बेवणूरचे सरपंच,चंदनशिवे आदी उपस्थित होते.
     यावेळी तुकाराम माळी यांनी शाहु महाराज यांनी केलेल्या सामाजिक सुधारणा विषयी माहिती दिली.राजर्षी शाहु महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या राज घराण्यातील राधाबाई व जयसिंगराव घाडगे यांच्या पोटी झाला. नंतर ते कोल्हापूर येथील संस्थान मध्ये दत्तक झाले. दत्तक नंतर त्यांचे नामकरण शाहु असे करण्यात आले. राजर्षी शाहु महाराज सन १८९४ सालापासून राज्यकारभाराची दूरा सांभाळू लागले.त्यांनी आपल्या राजवटीत अनेक सामाजिक सुधारणा केल्या. सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण, समाजातील विविध घटकांना बोर्डींग,अस्पृश्य मुलाना असलेल्या वेगळ्या शाळा बंद करून सर्वांना एकत्र शाळा सुरू केल्या २६ जून १९०२ रोजी आपल्या संस्थानात मागासवर्गीयांना पन्नास टक्के आरक्षण सुरू केले. गंगाराम कांबळे याना हाॅटेल काढून देऊन स्वत: त्याठिकाणीं चहा पित असत.राधानगरी धरण,शाहु मिल,जयसिंगपूर व्यापारी केंद्र सुरू केले.कोल्हापूर मध्यें कुस्तीस प्राधान्य देऊन सुधारणा केल्या.कायद्याच्या आधारे भारतातील अस्पृश्यता नष्ट करण्याचे कार्य सर्वप्रथम छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केले. राजर्षी शाहू महाराजांनी जीवाची व सत्तेची बाजी लावून आपल्या कोल्हापूर संस्थानात कायद्याने अस्पृश्यता बंद केली. राज्यकारभाराची सूत्रे हाती घेताच सन १८९४ पासूनच राजर्षींनी गोरगरीब, दलित-पीडित जनतेसाठी सत्ता राबवायला सुरुवात केली. १८९६ साली कोल्हापूर संस्थानात मोठा दुष्काळ पडला. त्या प्रसंगी त्यांनी स्वत: घोड्यावर बसून, प्रसंगी पायी फिरून, जनतेची दु:खे दूर केली. लोकांच्या अडीअडचणी जाणून प्रत्येकाला मदत करण्याचे धोरण आखले. महाराजांच्या विद्यार्थी दशेत त्यांचे गुरू एस. एम. फ्रेझर यांनी त्यांच्यावर पाश्चात्य उदारमतवादी शिक्षणाचे व संस्कृतीचे चांगले संस्कार केले होते. त्यांची जडणघडण ज्या वातावरणात झाली, त्या परिस्थितीचे काही एक संस्कार त्यांनी आयुष्यभर जपले. आई, वडील आणि पोटच्या धाकल्या मुलाचा, प्रिन्स शिवाजीचा आकस्मिक मृत्यू त्यांच्या मनावर आघात करून गेला होता. काही काळ त्यांनी विरक्तीतही घालविला होता. त्यामुळे यापुढे दीन-पतितांचा उद्धार हेच त्यांनी आपले जीवितकार्य ठरवले होते. 'दलित-पतितांचा उद्धार करण्याची शाहू छत्रपती महाराजांची मनोभूमिका ही काही एक दिवसात तयार झाली नव्हती. ही भूमिका हळूहळू काही प्रसंगांच्या अनुभवांतून, उत्क्रमणशील मार्गाने निर्माण झाली आहे, 
      इ. स. १८९९ साली घडलेल्या 'वेदोक्त प्रकरणापासून' धडा घेऊन राजर्षींनी अस्पृश्यांच्या कल्याणाचे अनेक धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली. १९०१ पासून त्यांनी कोल्हापुरात विविध जातींच्या मुलांसाठी वसतिगृहे काढायला प्रारंभ केला. १९०६ साली त्यांनी अस्पृश्य मुला-मुलींसाठीही वसतिगृहे काढली. शाळा काढल्या. त्यांनी अस्पृश्य वर्गाच्या भल्यासाठी सातत्याने अनेक आदेश काढले. सर्वांत महत्त्वाचा आदेश २४ नोव्हेंबर १९११ रोजी काढला. त्याअन्वये सर्व अस्पृश्य वर्गास सर्व प्रकारचे शिक्षण मोफत करण्यात आले. याशिवाय अस्पृश्यांतील हुशार विद्यार्थ्यांना दरबारकडून वेळोवेळी खास शिष्यवृत्त्या दिल्या जाऊ लागल्या. ७ एप्रिल १९१९च्या एका आदेशान्वये, 'अस्पृश्य लोकांची दैन्यावस्था ध्यानी घेऊन' त्यांच्या शिक्षणास उत्तेजन द्यावे, या हेतूने महाराजांनी त्यांना पुस्तके, पाट्या, पेन्सिली मोफत देण्यासाठी अडीच हजार रुपये मंजूर केले. २८ सप्टेंबर १९१९ रोजी महाराजांनी संस्थानातील अस्पृश्यांच्या स्वतंत्र शाळा बंद केल्याचा आदेश जारी केला. त्यात ते म्हणतात, 'करवीर इलाख्यात अस्पृश्य लोकांच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा असतात त्या सर्व येत्या दसऱ्यापासून बंद करण्यात याव्यात व अस्पृश्यांच्या मुलांस सरकारी शाळांतून, इतर लोकांच्या मुलांप्रमाणेच दाखल करून घेत जावे. सरकारी शाळांतून शिवाशिव पाळण्याची नसल्याने सर्व जातींच्या व धर्माच्या मुलांस एकत्र बसविण्यात येत जावे.' शिक्षणाच्या सोयीबरोबरच महाराजांनी आपल्या संस्थानातील अस्पृश्यांच्या भौतिक विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या. तीन वेळा हजेरीची पद्धत बंद करण्यासाठी २७ जुलै १९१८ रोजी खास आदेश काढला. त्यात ते म्हणतात, 'इलाखे मजकुरी गुन्हेगार जातींच्या लोकांची हजेरी दररोज पोलिस पाटलाकडे होती, त्यातील काही जातींची हजेरी माफ केली असून, काही काही ठिकाणी त्यांची हजेरी अद्याप घेतली जाते, या हजेरीपासून त्या त्या जातींच्या लोकांची फार गैरसोय होते ती सर्व अडचण दूर झाली पाहिजे. यासाठी हुकूम देण्यात येतो की, महार, मांग, रामोशी व बेरड या चार जातींच्या लोकांची हजेरी बंद करण्यात यावी.'
      डॉ. भीमराव रामजी आंबेडकर नावाचा अस्पृश्य महार जातीतील एक तरुण अमेरिकेला जाऊन उच्च विद्याविभूषित झाल्याची माहिती मिळताच छत्रपतींना खूप आनंद झाला. डॉ. आंबेडकर तेव्हा मुंबईतील सिडनेहॅम कॉलेजात अर्थशास्त्राचे प्रोफेसर होते. तेव्हा मुंबईला गेले असताना स्वत: शाहू राजांनी त्यांचा घरी जाऊन सत्कार केला व 'माणगाव परिषदे'चे त्यांना आमंत्रण दिले. महाराजांच्या या आमंत्रणाचा स्वीकार करून डॉ. आंबेडकर जेव्हा करवीर संस्थानातील माणगावात आले, तेव्हा महाराजांनी त्यांचे यथोचित आदरातिथ्य केले. ३१ जानेवारी १९२० रोजी डॉ. आंबेडकरांनी शाहू छत्रपतींच्या आर्थिक मदतीने 'मूकनायक' हे पाक्षिक सुरू केले होते. कागल जहागिरीतील माणगावात गावकऱ्यांनी २२ मार्च १९२० रोजी 'दख्खन अस्पृश्य समाजाची परिषद' डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बोलावली. या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराज उपस्थित होते. या परिषदेत महाराजांनी 'मूकनायक'मधून डॉ. आंबेडकरांनी केलेल्या लिखाणाचे जाहीर कौतुक केले. या परिषदेत बोलताना महाराजांनी आपण 'हजेरी प्रथा' का बंद केली याचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, 'अस्पृश्य लोकांची हजेरी माफ करण्याची बुद्धी मला का झाली याचे कारण ह्याप्रसंगी थोडक्यात सांगावे असे मला वाटते. हजेरी असल्यामुळे ह्या गरीब लोकांवर गावकामगारांचा व इतर अधिकाऱ्यांचा फारच जुलूम होत होता. गैरहजेरीची भीती घालून त्या गरीब लोकांकडून अधिकारी लोक फुकट काम करून घेत होते. गुलामगिरीपेक्षाही ह्या विसाव्या शतकात अशी गुलामगिरी चालली आहे. ज्यांना ही हजेरी होती, त्यांना आपल्या जवळचे आप्त-इष्ट पै-पाहुणे कोणी आजारी पडल्यास त्यांना ताबडतोब भेटता येत नव्हते. कित्येक वेळा तशी भेट न होताच ते मरत होते. मी असे प्रत्यक्ष पाहिले आहे की, कित्येक वेळा लहान आजारी मुलांच्या आयांना व बापांना वेळी अवेळी जबरदस्तीने वेठीस धरून नेल्यामुळे ती लहान मुले मेलेली आढळली आहेत. यापेक्षा जुलूम काय असायचा?' आपल्या भाषणात छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खूप वेळा आदराने मित्र म्हणून उल्लेख केला. ते म्हणतात, 'डॉ. आंबेडकर हे विद्वानांचे एक भूषणच आहेत. आर्य समाज, बुद्ध समाज व ख्रिस्ती समाज यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते. परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत, याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत व मीही मानतो.' या परिषदेत महाराजांनी आपण केलेल्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या कायद्यांची इत्थंभूत माहिती दिली. १९०२ साली २६ जून रोजी आपल्या संस्थानात मागासवर्गीयांना सर्व नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण दिल्याचेही महाराजांनी सांगितले. तसेच पारंपरिक जातिआधारित कुलकर्णी वतन बंद करून तलाठी पद्धत सुरू केली असून अस्पृश्य तरुणांनी अभ्यास करून तलाठी व्हावे, अधिकारी व्हावे असेही सुचविले. तसेच या परिषदेच्या भाषणात त्यांनी शेवटी जनतेला सांगितले की, 'तुम्ही तुमचा पुढील पुढारी शोधून काढलात, ह्याबद्दल मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत, इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, असे माझी मनोदेवता मला सांगते.' माणगाव परिषदेत छत्रपती शाहूमहाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी व्यक्त केलेला विश्वास पुढील काळात डॉ. आंबेडकरांनी सार्थ करून दाखविला. भाषणाच्या शेवटी महाराज म्हणाले होते, 'आंबेडकरांना माझी विनंती आहे की, त्यांनी जाण्यापूर्वी मेहरबानीने माझे रजपुतवाडीच्या कँपवर माझ्याबरोबर भोजनाला येण्याची तसदी घ्यावी.' याच आमंत्रणाचा स्वीकार करून बाबासाहेब सोनतळीला कँपवर गेले. भोजनाच्या वेळी महाराजांनी स्वत: आग्रह करून त्यांना यथेच्छ भोजन करायला लावले. प्रतिष्ठित सवर्णांच्या समक्ष दोघेही सोबतच जेवले व स्वत: रेल्वे स्टेशनवर जाऊन महाराजांनी त्यांना मुंबईच्या रेल्वेत बसवून निरोप दिला. या परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांच्या अस्पृश्योद्धारविषयक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, त्यांचा यथोचित गौरवपूर्ण उल्लेख केला व सांगितले की, इथून पुढे प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने राजर्षी शाहू महाराजांचा २६ जून हा वाढदिवस एखाद्या सणाप्रमाणे आनंदाने साजरा करावा.
       राजर्षी शाहूमहाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या कोल्हापूर संस्थानात सन्मानाने बोलावून त्यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव येथे अस्पृश्यता निवारण परिषद घेतली. या घटनेचे पडसाद पुढे संपूर्ण देशभर उमटून अस्पृश्योद्धाराच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. याच परिषदेत शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच अस्पृश्यांचे एकमेव नेते असतील, असे जाहीर करून त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. या परिषदेत महाराजांनी बाबासाहेबांचा यथोचित सन्मान करून, त्यांच्या नेतृत्वाला नवी ऊर्जा दिली. तसेच 'मूकनायक' चालविण्यासाठी रुपये अडीच हजारांची नगदी मदत दिली. तसेच अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
       माणगाव परिषदेने डॉ. आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज असे दोन खंबीर नेते अस्पृश्य समाजाला एकाच वेळी दिले. पुढे या दोघांनी मिळून अस्पृश्यता, जातिभेद, अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले. माणगाव परिषदेनंतर लगेच १७ एप्रिल १९२० रोजी छत्रपती शाहूंच्या हस्ते नाशिक येथे अस्पृश्यांसाठी वसतिगृहाची पायाभरणी झाली. दि. १३ व १५ मे रोजी करवीर गॅझेटमध्ये आदेश काढून महाराजांनी अस्पृश्यांची वेठबिगारी कायद्याने बंद केली. दि. ३० मे ते १ जून १९२० या कालावधीत नागपूर येथे 'अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद' भरली. या परिषदेचे अध्यक्षस्थान छत्रपती शाहूमहाराज यांनी भूषविले. ही परिषद डॉ. आंबेडकरांनी भरविली होती. ७ जून १९२० रोजी मांग-महारादी गुलामांना गुलामगिरीतून पूर्णपणे मुक्त केल्याची राजाज्ञा शाहूमहाराजांनी दिली. दरम्यानच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला जाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना सढळ हाताने मदत करून लंडनला पाठविले. स्वत: राजर्षी मुंबईत डॉ. आंबेडकरांना जाऊन भेटले व शिक्षणासाठी मदत केली. डॉ. आंबेडकर लंडनमध्ये असताना दि. १६ फेब्रुवारी १९२२ रोजी राजर्षी दिल्ली येथील 'तिसऱ्या अ. भा. अस्पृश्य परिषदेला' हजर राहिले व त्यांनी अध्यक्षपद भूषवून आपण हे आंबेडकरांचेच कार्य करीत असल्याचे सांगितले. लंडनला गेल्यानंतरही डॉ. आंबेडकर व शाहू छत्रपती महाराज यांचा पत्रव्यवहार थांबला नव्हता. तो शेवटपर्यंत सुरू होता. या दोघांच्या  १९१९ ते १९२२ या चार वर्षांतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जिव्हाळ्याचा पत्रसंवाद  उपलब्ध आहे. लंडनहून बाबासाहेबांनी पैशांची अडचण सांगावी आणि महाराजांनी ती तत्परतेने पैसे पाठवून भागवावी असे अनेकदा घडले आहे. या दोन महापुरुषांमधील नाते हे केवळ व्यावहारिक नव्हते, तर त्याला भावनेची, जिव्हाळ्याची, आपुलकीची आणि प्रेमाची किनार होती, हेच या पत्रव्यवहारातून दिसून येते.
      शाहू महाराजांच्या तब्येतीची काळजीही डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. या दोन महामानवांची भेट आणि पुढील स्नेहसंबंध ही माणगाव परिषदेचीच देण आहे. आज जातीय ध्रुवीकरणाच्या काळात माणगाव परिषद एक प्रकाशकिरण होऊ पहात आहे. या अमूल्य ठेव्याचे सातत्याने स्मरण केले पाहिजे.
       फुले, शाहु,आंबेडकर यांच्या महाराष्ट्र राज्याचे या महामानवांचे ६ मे १९२२ साली मुंबई येथे निधन झाल्याने दिन दलित-पीडित यांना फार मोठ्या वेदना झाल्या. या महापुरुषांस जयंती निमित्त मानाचा मुजरा.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष