करजगीतील वादग्रस्त रेशन दुकान परवाना रद्द करा । मागासवर्गीयांवर अन्याय; बसपा व रविदास समता परिषदेचा आंदोलनाचा इशारा
रेशन दुकान परवाना रद्दसाठी जतचे प्रांताधिकारी प्रशांत आवटे व तहसीलदार सचिन पाटील यांना कारवाईच्या मागणीसाठी निवेदन देताना कार्यकर्ते.
जत/प्रतिनिधी: करजगी ता. जत येथील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान अशोक रेवणसिध्द जेऊर हे चालवित असून सदर रेशन दुकानामध्ये गावातील मागासवर्गीय व इतर समाजातील लोक रेशन आणणेसाठी गेलेनंतर सदर दुकानदार धान्याचे वाटप नियमानुसार न करता तसेच अडाणी लोकांचा गैरफायदा घेऊन कमी माल देण्याबरोबरच स्थानिक बाजारातील इतर माल सक्तीने घ्यायला लावून आर्थिक लूट केली जात आहे. याचा जाब विचारल्यास महिला व जेष्ठ नागरिकांना एकेरी भाषेत व उध्दटपणे बोलुन तसेच शिवीगाळ व दमदाटी करून माझ्याविरुध्द कोठेही तक्रार करा असे बोलुन अपमानास्पद वागणूक देतात. पुढच्या महिन्यापासून दुसऱ्या गावातील रेशन दुकानातून धान्य घेऊन जाणेस सांगतात. या दुकानदाराच्या मनमानी कारभाराला येथील जनता कंटाळले असून या दुकानावर कारवाई करून परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा यासाठी जत तालुका बहुजन समाज पार्टी व गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने जतचे प्रांत व तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या वादग्रस्त रेशन दुकानातून शासनाकडून देण्यात येणाऱ्या गहू, तांदूळ, डाळी या व्यक्तीरिक्त इतर स्थानिक बाजारातील चहापूड, खाद्यतेल, खोबरेल तेल, कपड्याचे साबण, अंगाला लावयचा साबण, कपडे धुण्याचे पावडर व अन्य वस्तू गरीब व मागासवर्गीय ग्राहकांना सक्तीने व सक्तीने विकत घ्यायला लावून लावून माथी मारले जात आहे. सदरच्या वस्तू बाजार भावापेक्षा जास्त दराने लोकांना विक्री केली जात आहे. कोविड 19 काळामधील शासनाकडून मिळणारे मोफत धान्य वाटप नियमानुसार झालेले नसून याची त्रयस्थ यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी. संबंधित करजगी या गावातील अन्यायग्रस्त मागासवर्गीय व इतर समाजातील लोकांनी दि. 16/09/2020 रोजी लेखी तक्रार दिली आहे. त्यांनतर संबंधित विभागाच्या निरीक्षकांनी प्रत्यक्षात दुकानात येऊन या दुकानाचा पंचनामा व गावातील 56 लोकांचे जबाब नोंदविलेले असून अद्यापही दुकानदारावर कारवाई झालेली नाही. तरी करजगी येथील सदर सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानचे लायसन रद्द होऊन दुकानदार अशोक रेवणसिध्द् जेऊर यांचेवर कारवाई करावी अन्यथा आम्हास आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल असा इशारा बहुजन समाज पक्ष व गुरू रविदास समता परिषदेने दिला आहे. तसेच याबाबतचे निवेदन मा. तहसीलदारसो जत व प्रांताधिकारीसो यांना दिले आहे. यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, प्रभारी महादेव कांबळे, बामसेफ संयोजक महेश शिंदे, प्रभारी गौतम सर्जे, शहर अध्यक्ष सुनिल क्यातन व अखिल भारतीय संत रविदास परिषद प. महाराष्ट्र अध्यक्ष किरण शिंदे, जत तालुका अध्यक्ष अरुण साळे व करजगी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment