जत तालुक्यातील कोसारी येथे विहिरीच्या पाण्यावरून वाद | काका व पुतण्याचा तलवारीने खून | चौघेजण गंभीर जखमी | तालुक्यात खळबळ
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत तालुक्यातील कोसारी येथे सामाईक विहिरीच्या पाण्याच्या कारणावरून चुलता व पुतण्याचा तलवारी, कुऱ्हाडीचे घाव घालून भावकीतीलच कुटुंबाने खून केला. यात चौघे जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. खूनाच्या या घटनेने जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
विलास नामदेव यमगर (वय ४५) व प्रशांत दादासाहेब यमगर (२३, दोघेही रा. कोसारी ता.जत ) अशी मृतांची नावे असून, दादासाहेब नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके, विजय विलास यमगर (सर्व रा. कोसारी ता.जत जिल्हा सांगली ) यांच्यासह एक महिला गंभीर जखमी आहे. ही घटना आज, शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास कोसारी गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरील म्हारनूर वस्तीजवळ घडली.
कोसारीजवळ यमगर कुटुंबीयांची मोठी शेती आहे. या शेतीतील चार गुंठ्यात असणाऱ्या विहिरीतील पाण्याच्या पाळीवरून भावकीतच वाद सुरू आहे. शनिवारी सकाळी यमगर भावकीत पाण्यावरून पुन्हा वाद उफाळला.दहा ते पंधरा हल्लेखोरांनी यमगर कुटुंबावर तलवार,चाकू, कुऱ्हाड, दगड, दांडक्यांनी जोरदार हल्ला केला. त्यात विलास यमगर व प्रशांत यमगर हे चुलते-पुतणे ठार, तर चौघे जखमी झाले. या चौघांवर देखील जत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच जतचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्यासह मोठा पोलिसफाटा कोसारी येथे दाखल झाला आहे. या घटनेने गावात तणाव निर्माण झाला आहे. घटनेनंतर संशयितांनी पलायन केले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. एल.सी.बी ,पोलीस पथके शोधासाठी रवाना झाली आहेत.
Comments
Post a Comment