सेवेला निवृत्ती नसते: प्रा. किसन कुराडे
डॉ. निर्मला मोरे यांच्या सेवागौरव समारंभाच्या निमित्ताने गौरवोद्गार
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- माणसाच्या आयुष्यात बालपण, तारुण्य, प्रौढावस्था व वृद्धापकाळ असे वेगवेगळे टप्पे असतात. नोकरीमध्ये दीर्घकालीन सेवा करूनही प्रत्येक टप्प्यात माणसाला काम करावेच लागते. याचे आदर्श उदाहरण म्हणून आपण शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्याकडे पाहू शकतो. त्यांनी आयुष्यभर शिक्षणाची गंगा गरीब, वंचित व खेडोपाड्यातील मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्यभर सेवा केली. सेवेला निवृत्ती नसते. डॉ. निर्मला मोरे यांच्याकडूनही आयुष्यभर सेवा घडत राहिल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसन कुराडे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयात मराठीच्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. निर्मला वसंतराव मोरे यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या व सेवागौरव समारंभाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे माजी प्रशासन सहसचिव प्राचार्य पुंडलिक चव्हाण, विद्यावाचस्पतीचे मार्गदर्शक डॉ. दत्ता पाटील, साहित्यिक जी. पी माळी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.
आपल्या सेवागौरव समारंभामध्ये डॉ. निर्मला मोरे म्हणाल्या, तीन दशके श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या राजे रामराव महाविद्यालयामध्ये मराठीची प्राध्यापिका म्हणून निष्ठापूर्वक काम करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होताना माझे विद्यार्थी व सहकारी यांच्यापासून दूर जाताना मनाला वेदना होतात. अनेक वर्षाचा विद्यार्थी व सहकारी यांच्याशी असणारा सहवास मिळणार नाही, याचे निश्चितच दुःख राहील. मात्र भविष्यामध्ये विविध गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून सेवा करतच राहीन. इयत्ता आठवीमध्ये असताना लग्न होऊन पतीच्या घरी आल्यापासून ते विद्यावाचस्पती (पीएचडी) ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी मिळोपर्यंत माझ्या पतीने, कुटुंबातील सर्व सदस्य व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळेच मोठी ध्येये गाठता आली, असेही त्या म्हणाल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पुंडलिक चव्हाण म्हणाले, पती व पत्नी दोघेही श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवेत असताना नकळत कुटुंब व परिवाराचा त्याग करावा लागतो. अशा वेळी आपल्या मुलांबाळांकडे विशेष लक्ष राहत नाही. अशा परिस्थितीतही मोरे दांपत्यांनी आपले कुटुंब याचबरोबर महाविद्यालयातील सेवा अतिशय निष्ठापूर्वक व प्रामाणिकपणे बजावली आहे. यावेळी त्यांच्या विद्यावाचस्पतीवर आधारित समकालीन मराठी ग्रामीण कथेतील स्त्री जीवन आणि पाणी समस्या या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. मोरे कुटुंबियांच्या वतीने त्यांचा सेवागौरव मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सेवागौरव समारंभाच्या निमित्ताने पौर्णिमा कदम, प्रतिभा मोरे, आर्या पाटील, ऐश्वर्या सातपुते, अमृता सावंत, सुधीर चव्हान, शिवाजीराव बिसले, संगीता देशमुख यासह डॉ. निर्मला मोरे यांचे कुटुंबीय व नातेवाईकांनी आपली त्यांच्याप्रती मनोगते व्यक्त केली व त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
या सेवागौरव समारंभाचे स्वागत आणि प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्टाफ सेक्रेटरी डॉ. भीमाशंकर डहाळके, सूत्रसंचालन राजेंद्र माने तर आभार अतुल मोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, मोरे कुटुंबीय, नातेवाईक व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment