तरूण वयातचं जीवनाला आकार मिळतो: डॉ. अरुण शिंदे

राजे रामराव महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न | गुणवंत प्राध्यापक, खेळाडू व विद्यार्थ्यांचा केला सन्मान



जतवार्ता न्यूज नेटवर्क:- समाजमाध्यमाच्या या युगात तरुण विद्यार्थी सैरभैर झाले असून विद्यार्थ्यांनी शिक्षण, आरोग्य व करिअरकडे लक्ष दिले पाहिजे. आयुष्याचा आनंद घेत या वयातचं जीवनाला खरा आकार मिळतो, असे प्रतिपादन प्रेरक वक्ते डॉ. अरूण शिंदे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत जोत्स्नाराजे डफळे होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, कार्याध्यक्षा डॉ.  निर्मला मोरे उपस्थित होत्या. 
         आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना श्रीमंत जोत्स्नाराजे डफळे म्हणाल्या, आजच्या तरूणांमध्ये प्रचंड उर्जा आहे. या उर्जेचा वापर चांगल्या कार्यासाठी केला तर जीवन सुखी व आनंदी होते. खडतर परीस्थितीतुनच माणसाची समृद्धी होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापन करून आपले जीवन घडवावे. 
       प्रारंभी विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध शेलापागोट्याचे वाचन व सादरीकरण महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केले. त्यानंतर प्रा. अभिजीत चव्हाण यांनी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या अहवालाचे वाचन करून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. यामध्ये राष्ट्रीय परिषदा व कार्यशाळेचे यशस्वी आयोजन,राष्ट्रीय सेवा योजना, मुक्तपीठ, एक तास ग्रंथालयात, आंतरवाशिता, कला, क्रिडा, सांस्कृतिक व संशोधन याचा समावेश होता. शारीरिक शिक्षण संचालक प्रा अनुप मुळे यांनी वर्षभरात क्रिडा क्षेत्रातील खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचा आढावा घेतला. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत प्राध्यापकांचा सन्मान केला. विद्यावाचस्पती ही सर्वोच्च पदवी मिळवणारे डॉ.ओमकार कुडाळकर, डॉ. अशोक बोगुलवार, डॉ.शंकर सौदागर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. राजेंद्र लवटे, डॉ. मल्लाप्पा सज्जन, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल प्रा. कृष्णा रानगर, डॉ. भिमाशंकर डहाळके, डॉ. निर्मला मोरे, डॉ. शिवाजी कुलाळ, मनोहर मोरे, सेट परीक्षा पास झाल्यामुळे प्रा. प्रियांका भुसणुर, प्रा. मयूर अंकलगी, तर संशोधन अधिछात्रवृत्ती मिळवल्यामुळे प्रा. राजेश सावंत , प्रा. प्रदीप गायकवाड, प्रा. सागर इंगवले, प्रा. नवनाथ लवटे यांचा प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
       श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने विवेकानंद सप्ताहाच्या निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी सानिका शिंदे व सानिका लवटे, चित्रकला स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणारी अमृता घेज्जी व इशिका डफळे, निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावणारी साक्षी पाटील तर गुरुदेव कार्यकर्ते गटामधून वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवणारे डॉ. सतीशकुमार पडोळकर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र मिनी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सायकलिंग व कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे दत्तात्रय चौगुले व प्रांजल सावंत, अखिल भारतीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झालेली खुशबू मुजावर, राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलेला राहील नदाफ, शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय सायकलिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावलेला संदीप मोटे, प्रगती सावंत, प्राजक्ता टेंगळे तसेच विद्यापीठ, जिल्हास्तरीय व महाविद्यालयीन स्तरावरील चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर वर्षातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून कला शाखेतून रवींद्र मदभावी, वाणिज्य शाखेतून ज्योती माळी, विज्ञान शाखेतून प्रगती सावंत, बीसीए शाखेतून ओमकार रजपूत, पदवीत्तर विभागातून दीपक साळे व सुप्रिया बाबान्नवर यांनी बाजी मारली. 
         या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी तर प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ.भीमाशंकर डहाळके यांनी करून दिली. सूत्रसंचालन डॉ. सतीशकुमार पडोळकर व प्रा.अतुल टिके यांनी तर आभार डॉ. राजेंद्र लवटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडू व विद्यार्थी -विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड