सुखदेव नरळे एक सुसंस्कृत प्राध्यापक : प्राचार्य डॉ. सुरेश पाटील
सेवा गौरव समारंभाच्या निमित्ताने गौरवोद्गार
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक व संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी सांगितलेल्या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार या ब्रीदवाक्यानुसार साडेतीन दशकापेक्षा जास्त आपली सेवा देणारे राजे रामराव महाविद्यालयातील मराठी विषयाचे जेष्ठ प्राध्यापक सुखदेव सोपान नरळे हे बापूजींच्या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराचा वसा घेऊन जगणारे, एक प्रामाणिक, मितभाषी व सुसंस्कृत प्राध्यापक असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. ते प्रा. सुखदेव नरळे यांच्या नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित सेवा गौरव समारंभामध्ये बोलत होते. यावेळी नरळे यांच्या पत्नी, आई, कुटुंबीय, नातेवाईक व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.
आपल्या सेवा गौरव सत्काराला उत्तर देताना प्रा. नरळे यांनी आपला संपूर्ण जीवनप्रवास उपस्थितांसमोर मांडला. ते म्हणाले, 'माणसाच्या आयुष्यात चांगल्या - वाईट गोष्टी घडत असतात. एक व्यक्ती म्हणून माझी जडणघण होत असताना माझे आजी आजोबा, मामा, आई -वडील व पत्नी यांचा मोठा वाटा आहे. डॉ. बापूजी साळुंखे यांच्या संस्कारांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो. माझ्या जीवनात मला मार्गदर्शन करणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी या निमित्ताने ऋण व्यक्त करतो.' या सेवा गौरव समारंभावेळी राजे रामराव महाविद्यालयातील त्यांचे सहकारी प्रा. कृष्णा रानगर, डॉ. शंकर गावडे, डॉ. राजेंद्र लवटे , प्रा. रामदास बनसोडे व प्रा. धर्मराज कुंभार यांनी त्यांच्याप्रती आपली भावना व मनोगते व्यक्त केली व त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
या सेवा गौरव समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. बाबासाहेब बेंडे पाटील, सूत्रसंचालन प्रा. अतुल टिके तर आभार डॉ.भीमाशंकर डहाळके यांनी व्यक्त केले. या समारंभाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रा.सुखदेव नरळे यांचा मित्र परिवार,नातेवाईक, सामाजिक - राजकीय क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment