जत तालुका दुष्काळी तालुका जाहीर करा | शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यायासमोर आंदोलन | हभप तुकाराम बाबा महाराज यांची माहिती

 

जतवार्ता न्यूज नेटवर्क:- 
      जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती श्री. संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
       तुकाराम बाबा महाराज म्हणाले, यंदा पावसाने ओढ दिल्याने जत तालुक्यातील स्थिती भयावह झाली आहे. पाणी व जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करण्याची वेळ आमच्यावर आली असताना शासन व प्रशासनला मात्र याबाबत गांभीर्य नाही हे दुर्देव. पावसाने ओढ दिल्याने हक्काचा खरीप हंगाम वाया गेला आहे. पेरणी न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तेव्हा जिरायती शेतकऱ्यांना हेकटरी २५ हजार,  बागायत शेतकऱ्यांना ५० हजार रुपये किमान अनुदान द्यावे व ते त्यांच्या खात्यावर जमा करावेत. जत तालुक्यातील काही भागात म्हैसाळचे पाणी आल्याने हिरवळ दिसत असली तरी प्रत्यक्षात तेथील पिके जळून गेली आहेत. जत पूर्व भागात दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. तेव्हा तातडीने त्याची दखल घेवून उपाययोजना कराव्यात, मागेल त्या गावाला तात्काळ टँकर सुरू करावेत, चारा व पाण्याअभावी मुक्या जनावरांचे हाल सुरू आहेत. जनावरांसाठी चारा छावणी, चारा डेपो सुरू करावेत, म्हैसाळचे आवर्तन सुरू करून जत तालुक्यात ज्या ठिकाणी म्हैसाळचा कालवा व बंदिस्त पाइपलाइनने पाणी देणे शक्य आहे तेथे पाणी सोडावे, म्हैसाळचे आवर्तन सुरू करून जत तालुक्यातील तलाव भरून घ्यावेत या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.
       यावेळी बळीराजा पार्टीचे प्रदेशाद्यक्ष बाळासाहेब  रास्ते,आजीत कारंडे कवठेमकाळ मानव मित्र पिंटू मोरे, विशाल वाघमारे, वैभव जाधव, श्याम मोरे आदी उपस्थित होते.

आंदोलन तीव्र करणार -
       जत तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया पसरली आहे. दुष्काळ जतकरांना गिळायला निघालाय तरी शासन व प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही. महापूर येणार म्हटलं की प्रशासनाच्या बैठकावर बैठका घेतल्या जातात मात्र जतच्या दुष्काळाबाबत कोणीच बोलण्यास तयार नाही. जतकरांवर संकट आल्यास सर्वजण मूग गिळून गप्प का आहेत. असा सवाल उपस्थित करत तुकाराम बाबा महाराज यांनी शासन व प्रशासनाने तातडीने मागण्याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड