जतकरांनो चिंता करू नका, शासन तुमच्या पाठीशी | मंत्री सुरेश खाडे यांनी दिली जतकरांना ग्वाही | तुकाराम बाबा महाराज यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्र्याची भेट
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-
पाऊस लांबल्याने जत तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जतकरांनो चिंता करू नका शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिला आहे.
चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. तुकाराम बाबांच्या या आंदोलनाला विविध राजकीय व सामाजिक संघटनेने उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
आंदोलन यशस्वी झाल्यानंतर तुकाराम बाबा महाराज यांच्यासह बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते, रामदास शिंदे, भाऊसाहेब भोसले, तानाजी भोसले धुळा कोळेकर , सूर्यकांत ओलेकर ,खंडू मडके, रामचंद्र रणशिंगे, विवेक टेंगले, विक्रम कांबळे, उमेश कोरे, मोहसीन मणेर, सुरज मणेर, अजित कारंडे, अभिराजे शिंदे, दिगंबर कांबळे, शशिकांत डांगे, पांडुरंग कोळेकर, रामदास सावंत, प्रथमेश कदम, दीपक कोळेकर, पिंटू मोरे, विशाल वाघमारे, वैभव जाधव, श्याम मोरे तुकाराम मासाळ आदीनी सांगली येथे मंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली.
यावेळी तुकाराम बाबा यांनी मंत्री सुरेश खाडे यांना जतकरांच्या व्यथा व सध्याची अवस्था सांगितली. प्यायला पाणी, जनावरांना चारा नाही, तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शासन, प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही सांगा आम्ही जगायचे की मारायचा असा सवाल उपस्थित केला. जतला तातडीने मदत द्या अशी मागणी तुकाराम बाबा यांनी केली व विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री खाडे म्हणाले की, जत हा माझा जुना मतदार संघ आहे. पाऊस न पडल्याने तेथील परिस्थिती बदलली आहे, दुष्काळाच्या झळा बसत आहेत हे मान्य आहे. येत्या १५ जुलै पर्यत पाऊस पडेल असा अंदाज आहे. पाऊस पडला तर ठीक नाही तर जतकरांनी चिंता करायचे कारण नाही. शासन व प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. जनता व जनावरे वाचली पाहिजेत, त्यांना मदत मिळाली पाहिजे यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावू अशी ग्वाही मंत्री खाडे यांनी शिष्टमंडळाला दिली.
Comments
Post a Comment