जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी उद्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- पावसाअभावी जत तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. अवकाळी किंवा कसलाही पाउस झाला नसल्याने पिण्याचा पाणीप्रश्न तसेच जनावरांचा चारा आदी प्रश्नाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी शासनाने त्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी म्हैसाळ योजनेचे पाणी, जनावरांना चारा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांना जनावरांसहीत इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागणार आहे. या व इतर मागण्यासाठी महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या वतीने शुक्रवार दि. ७ रोजी जत तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी आप्पाराया बिराजदार, तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे नमूद केले आहे की, कायम दुष्काळी व अवर्षण प्रवणग्रस्त जत तालुका आहे. पावसाअभावी चालू वर्षी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात पाऊसच झाला नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे शासनाच्या निदर्शनास आणून देणे अत्यंत गरजेचे आहे. चालू वर्षी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. खरीप पिके वाया गेल्याने विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. शासनाच्या दुष्काळी संदर्भातील सर्व सवलती मिळाव्यात. तालुक्यात पाऊस नसला तरी कोयना, चांदोली धरणक्षेत्रात पाऊस सुरु आहे. म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करावे.
पिण्याच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. तसेच या आवर्तनाचे बिल टंचाई निधीतून भरावे. जनावरांच्या चाऱ्याकरिता शासनाकडून थेट अनुदान मिळावे. सध्या गाई, म्हशींच्या दुधाचे दर खूप कमी झाले आहेत. दुधदरात स्थिरता येणेसाठी शासनाने उपाययोजना कराव्यात या प्रमुख मागण्याकरिता शुक्रवार दि.७ रोजी सकाळी दहा पासून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे तसेच अन्य सर्व महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने तहसीलदार कार्यालय जत समोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment