नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत, आनंदात व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करूया - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

उत्सव काळात सामाजिक सलोखा राखुया 
पर्यावरण पूरक उत्सव साजरा करूया 

 सांगली : सांगली जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतो. जिल्ह्यात गणेशोत्सवाला एक वेगळी परंपरा असून यंदाचा गणेशोत्सवही शांततेत, आनंदात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करूया. गणेश मंडळांनी उत्सव काळात नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज केले.
 गणेशोत्सव सण व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने खरे क्लब हाऊस येथे आयोजित शांतता समिती सदस्य व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना  जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे  यांच्यासह पोलीस व संबधित विभागाचे अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
 जिल्ह्यातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या व ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन पोलीस प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी केली आहे. उत्सव काळात ध्वनी प्रदूषण, नदी प्रदूषण न करता पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळ व भक्तांनी पुढाकार घ्यावा. उत्सव काळात सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ शासन व प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांवर विश्वास ठेवावा. मंडळांनी उत्सव  काळात सामजिक उपक्रम राबविण्यास प्राधान्य द्यावे.  मंडळांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू नये. उत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या त्या-त्या विभागाकडून घ्याव्यात. गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी एस. टी. बस सुविधा देण्याबाबत एस. टी. महामंडळास कळविले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी सांगितले.
 गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक 28 सप्टेंबर रोजी होत आहे व याच दिवशी  ईद-ए-मिलाद असल्याने  मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादची मिरवणूक पुढे ढकलली याबद्दल त्यांचे अभिनंदन  करण्यात आले. सांगली जिल्ह्यात सर्वच सण समारंभ सामाजिक सलोखा राखून साजरे केले जातात. असाच सामाजिक सलोखा पुढील काळात राखुया आणि सांगली जिल्ह्याच्या लौकिकात भर घालूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
 यंदाच्या गणेशोत्सवामध्ये राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरावर स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी जिल्हा स्तरावरुन राज्य स्तरावर निवड होणाऱ्या एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र सन्मानपूर्वक वितरीत करण्यात येईल. सन 2023 मध्ये राज्यातील पहिल्या 3 विजेत्या गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून अनुक्रमे प्रथम क्रमांक 5 लाख रुपये, व्दितीय क्रमांक 2 लाख 50 हजार रुपये, तृतीय क्रमांक 1 लाख रुपये असे आहे. या स्पर्धेसाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक गणेश मंडळांनी अर्ज करावेत, या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.  
 पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले, सांगली जिल्ह्याला उत्सव साजरी करण्याची वेगळी परंपरा आहे. ही परंपरा जपून सण, समारंभ साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी योगदान द्यावे. मंडळांनी केलेल्या चांगल्या सूचनांची पोलीस विभागामार्फत दखल घेण्यात आली आहे. उत्सव काळासाठी स्पेशल पोलीस अधिकारी नेमण्याची कार्यवाही केली जाईल. उत्सव काळात लेझर शो मुळे डोळे व आरोग्याचा समस्या उद्भवत असल्याने मंडळांनी लेझर शो करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. मंडप टाकताना नियमांचे उल्लंघन करू नये. वाहतुकीस कोणताही अडथळा येऊ नये याची दक्षता घ्यावी. उत्सव काळात मंडळांनी 24 तास स्वयंसेवक नेमावेत. उत्सव काळात वापरण्यात येणारे वाहन सुस्थितीत असावे. पोलीस विभागामार्फत सर्वांना सहकार्य केले जाईल,असे त्यांनी सांगितले.
 महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे काम गणेशोत्सवापूर्वी केले जाईल. शहरातील मोकाट व भटक्या जनांवरांचा बंदोबस्त केला जाईल. गणेश विसर्जनासाठी मिरज येथील गणेश तलाव बरोबरच सांगलीत ही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले. मंडळांनी मंडप, स्वागत कमान याची परवानगी घ्यावी. ध्वनी व धूळ प्रदूषण होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.  महापालिकेमार्फत पर्यावरण पूरक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळासाठी स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 
 विद्युत वितरण विभागामार्फत गणेशोत्सव काळात अखंडित वीज पुरवठा देण्याची खबरदारी महामंडळामार्फत घेतली जाईल. उत्सवापूर्वी त्या-त्या विभागातील दुरुस्तीची कामे  केली जातील. गणेश मंडळांना उत्सव काळात  घरगुती दराने वीज पुरवठा केला जाणार असल्याने मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे, असे आवाहन विद्युत वितरण विभागामार्फत करण्यात आले.
 उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण गिल्डा यांनी प्रस्ताविक केले. बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काही सूचना मांडल्या व सण, समारंभ शांततेत साजरे करू असे आश्वासन दिले.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष