अचकनहळ्ळी येथील श्री बिसल सिद्धेश्वराची यात्रा ११ सप्टेंबर रोजी



जतवार्ता न्यूज नेटवर्क:
       सालाबादप्रमाणे अचकनहळ्ळी (ता. जत) येथील प्रसिद्ध  श्री बिसल सिद्धेश्वर देवाची यात्रा सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी देवालय परिसरात भरत असून यानिमित्ताने धावण्याच्या, सायकलीच्या स्पर्धांसह खिलार जनावरे प्रदर्शन, धनगरी ओव्या आणि कुस्ती मैदान स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे. 
      ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता 'श्री' च्या पालखीचे आगमन होणार असून साडेअकरानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या निमित्ताने आमदार विक्रमसिंह(दादा) सावंत, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, आण्णाप्पा महारुद्र गुडोडगी (विजापूर), सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय (नाना) शिंदे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील, अभिजितदादा पटसंस्थेचे (पुणे) संस्थापक सचिव विक्रम शिंदे, तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, गटविकास अधिकारी (जत पंचायत समिती) आप्पासाहेब सरगर, काँगेस कमिटीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग, उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. 
      यानिमित्ताने धावण्याच्या व सायकल शर्यतीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे 1501, 1001 आणि 701 रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. खिलारी जनावरे प्रदर्शन व निवड स्पर्धेमध्ये विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे1001, 701 आणि 501 तसेच उत्तेजनार्थ साठी 301 रुपयांचे रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र, ढाल प्रदान करण्यात येणार आहे. धनगरी ओव्या स्पर्धेमध्ये विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे 3001, 2001 आणि 1001 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर दुपारी तीन नंतर होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे 5001, 4001 आणि 3001 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. याशिवाय चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यांसाठी प्रत्येकी 2001 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
म्हाळाप्पा मल्हाळकर व ग्रामस्थ यांच्यावतीने अमावास्या महाप्रसाद तर दशरथ लक्ष्मण कोळी यांच्याकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
      देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मधुकर शिंदे, उपाध्यक्ष धुंडय्या (पिंटू) स्वामी, सचिव सिद्राया (बबन) शिंदे, खजिनदार बसाप्पा कोरे, श्रीरंग शिंदे, सोमलिंग माळी, जगन्नाथ बिराजदार, सिद्राया यमगर, आण्णासाहेब शिंदे, किरण भोसले, राम कुंभार, सागर सोलनकार, सदाशिव कोळी, जालिंदर व्हनकट्टे, सिद्धनाथ ऐवळे  यांच्यासह सरपंच सुनंदा कोळी, उपसरपंच महादेवी कोळी, ग्रामसेवक डी. व्ही. चव्हाण, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष किसन शिंदे, पप्पू पुजारी, सिद्धू पुजारी आदी जण यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

श्री बिसल सिद्धेश्वर सिद्धपुरुष आणि मंदिर पार्श्वभूमी:
      जत आणि परिसरात प्रसिद्ध असलेल्या श्री बिसल सिद्धेश्वर देवालयाबाबतची पार्श्वभूमी अशी: जत शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर सिद्धपुरुष महान तपस्वी श्री बिसलसिध्देश्वर देवस्थान आहे. हे देवस्थान अचकनहळ्ळी (ता.जत) हद्दीत व जत-येळवी राज्य मार्गालगत आहे. श्रींचे हे जुने मंदिर असून, मंदिरात श्रींची पिंड आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात देवाच्या मुखवट्याला आकर्षक फुलांनी सजवण्यात येते. श्रींची मूर्ती पाहून भाविकांचे मन प्रसन्न होते.  गाभाऱ्या समोर श्री सिध्देश्वर, नंदी व नंदीच्या समोर श्री सिध्देश्वर डिकमळ भविकांचे लक्ष वेधून घेते. या मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे. त्याचबरोबर मंदिरासमोर स्नानकुंडही पाहावयास मिळते. या ठिकाणी श्रावण महिन्यात दर सोमवारी देवालयाचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जातो. 
     गेल्या चार वर्षात मंदिर व मंदिर परिसराचा कायापालट करण्यात आला आहे. भाविकांना सर्व सोयी सुविधा देण्यात आल्या आहे. भक्तनिवास, मंदिर परिसरातील रस्ते, दिवाबत्तीची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, शिस्तबद्ध दर्शनासाठी रांगा, सर्व परिसर सीसीटीव्ही कॅमेराबद्ध, परिसरात वृक्ष लागवड अशा विविध सोयी दिल्याने महाराष्ट्रसह कर्नाटकातील भाविकांचा ओघ वाढू लागला आहे. 
     मंदिरात श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते. कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भक्तगणांच्या गर्दीने हा परिसर फुललेला दिसून येतो. सदरचे मंदिर ९०० वर्षांपूर्वीचे आहे. या बांधकामातून रेखीव व बांधीव कलाकृतीचे दर्शन होते. मुख्य मंदिर व मंदिराच्या चहुबाजुंनी तटबंदीचे उंच असलेले बांधकाम, मंदिरात जाण्यासाठी एकच मुख्य दरवाजा हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. 
     श्री बिसल्सिद्धेश्वर हे सिद्ध पुरुष सोलापूरहून शिष्य महालिंगाच्या इच्छेनुसार जत तालुक्यातील मिरवाड येथे जाण्याकरिता निघाले. दरम्यान श्री बिसलसिद्धेश्वर हे काराजनगी येथे शिष्य रेवाण्णा यांची भेट घेतली. या गावाजवळ जुने शिवमंदिर होते. या ठिकाणी योगपुरुष स्थिरावले. या ठिकाणी काही वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले व त्यांना उपदेश केला. या ठिकाणी निसर्गाचे व जगाचे शुद्धीकरण म्हणून अग्निकुंण्ड निर्माण केला. या ठिकाणी यात दही, दूध, तूप, लोप्णी टाकत असे. यासुळे वातावरण शुद्ध होते. यावेळी स्वामीजी चिंतन करत असत. या अग्निकुंडास काराजनगी येथील मलकनगौडा यांच्या घरातून दही, दूध, तूप अर्पण केले जात असे. हे आपल्या घरातून एकच दिवस या वस्तू श्री बिसलसिथ्देश्वर च्या अग्निकुण्डास अर्पण केले होते. ही माहिती मलकनगौडाची मोठी मुत्तगी भागीरथीला माहित होते. परंतु हा दिनक्रम असल्याचे लक्षात येताच भागीरथीने विरोध केला. श्री बिसलसिद्धेश्वर स्वामीजींना तिने शिव्या शाप दिले. ही गोष्ट त्रिकालज्ञानी योगेश्वरांना कळल्यानंतर ते मिरवाडच्या दिशेने वाट चालू लागले. 
वाटेतच जत शहरात मडकी विकण्यास गेलेला कुंभार शरणय्या भेटला. त्यास श्री बिसलसिथ्देश्वरांनी त्याच्याजवळ मलकनगौडास निरोप दिला. या गावातील दूध, दही, तूप, लोप्णी कोणालाही विकू नये. जर विकले तर त्या व्यक्तीस समाधान लाभणार नाही. त्यामुळे आजही या काराजनगी गावात हे पदार्थ विकले जात नाहीत. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी गावात दूध व्यवसाय करण्यास सुरुवात केली, परंतु हा व्यवसाय फार काळ टिकला नाही. त्यामुळे या गावात आजही दूध विकले जात नाही.
     या देवालयातील महान तपस्वी श्री बिसलसिध्देश्वर यांची अख्यायिका आहे की, मिरवाड गावांचे प्रमुख नंदेप्पागौडा यांचा मुलगा महालिंग हा वयाच्या बाराव्या वर्षी कुष्टरोगाच्या आजाराने ग्रासला होता. एका स्वामी (जंगम) च्या उपदेशाने कल्याणपट्टण शहरात सिध्दपुरुष म्हणजेच महान तपस्वी श्री सिध्देश्वर यांच्याकडे गेल्यास आपली व्याधी नष्ट होईल. यानुसार महालिंगाचे सर्व आजार नष्ट झाले. ते शिष्य म्हणून १२ वर्षे या स्वामीजींची सेवा केली असता, श्री सिध्देश्वरांनी आपले शिष्य महालिंग यांची कठोर परिक्षा घेतली. त्यात पात्र ठरल्याने महालिंगास आपल्या मिरवाड या गावी जाण्यास सांगितले. 
     मात्र तो तयार होत नव्हता. त्यास सिध्देश्वरांनी मी तुझ्या मातेस तुझी व्याधी बरी झाल्यानंतर पाठवितो असे सांगितले असून, आपली सेवा येथून ये जा करुन करण्यास सांगितले त्यावर महालिंग तयार झाले. आपल्या इच्छे प्रमाणे परमशिष्य महालिंगने रोज मिरवाडहून कल्याणपर्यंत मनोभावे दही, दूध, तूप, अग्निकुंण्डात घालत असे. या अपार भक्तीसागराला सिध्देश्वर प्रसन्न झाले. 
     महालिंगाची परिक्षा घ्यावयाची असल्याने कल्याणहून ते उत्तरेकडे काशीला, दक्षिणेकडील काशीला म्हणजे रामेश्वर व तिथेही महालिंग शोधत राहिले. नंतर सिद्धपुरुष बिसलसिद्धेश्वरने सोलापूर व नंतर अच्यूतपूर (अचकनहळळी) येथे जाण्याचे ठरले. त्यानुसार प्रत्येक परिक्षेत महालिंग यशस्वी झाला.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड