लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत येथिल श्री.यल्लमादेवी यात्रेत येणा-या भाविकांना करावा लागणार अनेक समस्यांचा सामना

 दि.८ जानेवारी २०२४ ते दि.११ जानेवारी २०२४ अखेर भरविण्यात येणार यात्रा


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    जत नगरिची ग्रामदेवता, महाराष्ट्र आणी उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, श्रीमंत डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान, नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या  श्री.यल्लमादेवीची यावेळची मार्गशीर्ष यात्रा ही दि.८ जानेवारी २०२४ ते दि.११ जानेवारी २०२४ अखेरीपर्यंत भरविण्यात येणार आहे.
    श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जतच्या वतीने यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. दि.२६ डिसेंबर पासून यात्रेत येणा-या व्यवसाईकांना जागा वाटप सुरू आहे. यात्रा अजून आठवडाभरावर येऊन ठेपली असलीतरी यात्रेत व्यवसाईक आतापासूनच येऊन आपापली दुकाने थाटत आहेत. यात्रेत मेवामिठाईची दुकाने व पाळणे यावेळी लवकरच आले आहेत. तसेच भेळवाले व हाॅटेल व्यवसाईक ही येऊ लागले आहेत. 
    जतची श्री.यल्लमादेवीची यात्रा ही खिलार जातीच्या जनावरांच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे. या जनावरे बाजाराचे संपूर्ण नियोजन हे सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीच्यावतीने केले जाते. सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीच्या वतीने यात्रेत कृषी प्रदर्शन ही भरविण्यात येते.
    या यात्रेत येणा-या भाविक भक्तांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जत ने विविध उपाययोजना केल्या असल्यातरी त्या तोकड्या पडत आहेत. त्यातच तत्कालीन जिल्हादंडाधिकारी यांनी श्री.यल्लमादेवी यात्रेकरिता अरक्षित केलेल्या जागेवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे होऊ घातली आहेत. त्यामुळे यात्रा भरविणे अवघड होत आहे.
    जत शहरालाच सद्या आठवड्यातून एकवेळा नगरपरिषदेमार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. यात्रा परिसरात तर एकच बोअरवेल आहे. या बोअरवेलवर विद्युत मोटार बसवून यात्रेत दोन ठिकाणी पाण्याचे टाकी ठेवून नळाव्दारे यात्रेकरूंना  पाण्याची सोय करून दिली असलीतरी ती कमीच पडणार आहे. त्यामुळे यात्रेत प्रशासनाने यात्रेकरूंसाठी टॅंकरव्दारे पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. 
    त्याचप्रमाणे यात्रेकरूं महिला व पुरूंषासाठी श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठानने तात्पुरत्या स्वरूपात ओढापात्राशेजारी उभी केलेली शौचालये ही यात्रेकरू व भाविक भक्तांसाठी अपुरी पडणार असून यात्रेकरू उघड्यावर शौच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी प्रतिष्ठान ने व प्रशासनाने श्री.क्षेत्र पंढरपूर याठिकाणी ज्या प्रमाणे नियोजन केले होते तसेच नियोजन श्री.यल्लमादेवी यात्रेत होणे गरजेचे आहे.
   श्री.यल्लमादेवी यात्रेसाठी महाराष्ट्रासह ,कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, तामीळनाडू येथिल व्यवसाईक व भाविकभक्त मोठ्या प्रमाणात येत असल्याने भाविकांच्या वाहनामुळे मोठ्या प्रमाणात धूळ पसरवून श्र्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने यात्रेत सर्वच रस्त्यावर दररोज टॅंकरव्दारे पाण्याची फवारणी करण्याची अवशक्यता आहे.
   तसेच कोरोणाच्या पार्श्वभूमीवर श्री.क्षेत्र शिर्डी याठिकानी श्री.साईभक्तांना साई दर्शनासाठी मास्कसक्ती केली आहे. त्याप्रमाणेच जत यात्रेतही मास्कसक्ती करणे आवश्यक आहे. श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जत, जत नगरपरिषद, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक जत, जत आगार, महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनी, सांगली कृषीउत्पन्न बाजार समिती, अन्न व भेसळ विभाग, आदी विभागांची यात्रा नियोजनाबाबत बैठक पार पडली असून यासाठी मंदिर परिसरात यात्रेवर लक्ष ठेवणे व यात्रा चांगल्या प्रकारे पार पाडणे यासाठी मंदिर परिसरात एक वाररूम तयार करण्याचा निर्णय बैठकित घेण्यात आला आहे. यातील किती विभागाचे अधिकारी हे यात्रा कालावधित आपल्या कर्तव्याला जागतील हे लवकरच समजेल.
जागा वाटपाबाबत यात्रा कमिटी कडून यात्रेत येणाऱ्या व्यावसायिकांबरोबर दुजाभाव केला जात आहे. काही ठिकाणी तर यात्रा कमिटीने ज्या व्यापाराला जागा दिली आहे. तो व्यापारी ती जागा दुप्पट किमतीमध्ये दुसऱ्या व्यापाऱ्यास विकत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ज्या व्यापाऱ्यांना जागा मिळाली नाही त्या व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष