स्वामी विवेकानंदांचे व्यक्तीमत्व म्हणजे मानवी जीवनाला वेढ लावणारं व्यक्तिमत्त्व होय; डॉ.सरिता पट्टणशेट्टी

 


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्व म्हणजे मानवी जीवनाला वेड लावणारं व्यक्तिमत्व असून संपूर्ण विश्वाला चेतना देणारं आहे. स्वामी विवेकानंदाचे  विचार हे संपूर्ण मानव जातीला प्रेरणा देऊन विचार करायला प्रवृत्त करणारे आहेत, असे प्रतिपादन डॉ.सरिता पट्टणशेट्टी यांनी केले.
     ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह सोहळा व राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जयंती यांच्या संयुक्त कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील हे होते. प्रारंभी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.अशोक बोगूलवार यांनी आपल्या प्रस्ताविकातून विवेकानंद सप्ताह साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करून सांगितला.
     स्वामी विवेकानंद हे युग प्रवर्तक असून त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेमुळे युरोपीय देश प्रभावित झाले असे सांगून डॉ.सरिता पट्टणशेट्टी पुढे म्हणाल्या की, आजच्या युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. आजच्या युवकांची एनर्जी ही समाज माध्यमांमध्ये खर्ची होत असून त्यामुळे आजच्या युवकांचे विचारच खुंटले आहेत. आपले विचार प्रगल्भ करायचे असतील तर विद्यार्थ्यांनी थोरामोठ्यांचे, महापुरुषांच्या चरित्रांचे पारायण केले पाहिजे, असेही त्या शेवटी म्हणाल्या.
     यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, देवधर्माच्या पुढे जाऊन संपूर्ण मानव जातीला उन्नतीचा मार्ग स्वामी विवेकानंदानी सांगितला. स्वामी विवेकानंदांचे विचार हे विश्वबंधुत्वाचे असून आपण त्यांचे विचार अंगीकारले तरच भारत विश्वगुरु बनेल असे सांगून डॉ.सुरेश पाटील शेवटी म्हणाले की, विवेकानंदांच्या विचारांमध्ये सकारात्मकता आहे आणि आजच्या निराशावादी युगात विवेकानंदांचे सकारात्मक विचार युवकांना प्रेरणा देणारे आहेत, म्हणून युवकांनी विवेकानंदांचे चरित्र वाचले पाहिजे. विवेकानंद हे योद्धा संन्याशी होते. त्यांनी युवकांना संघर्ष करा व युद्धाप्रमाणे लढा हिच शिकवण दिली‌. तिच शिकवण आजच्या युवकांनी आत्मसात करणे गरजेचे आहे असेही ते शेवटी म्हणाले.
    प्रारंभी प्रमुख पाहुण्या डॉ.सरिता पट्टणशेट्टी व प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या हस्ते श्री.स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.अशोक बोगूलवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मण मासाळ यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन प्रा.वैशाली मदने यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष