रिपाईचा विविध मागण्यासाठी जत येथे विराट मोर्चा
जतवार्ता न्यूज नेटवर्क:
म्हैसाळ विस्तारित योजनेतील ६५ गावांचे काम तातडीने सुरू करावेत, जत शहराला किमान एक तास रोज पाणीपुरवठा करावा, नगरपरिषदेला पूर्णवळ मुख्याधिकारी मिळावा व पालिकेचा कारभार पाण्याच्या टाकीऐवजी नगरपरिषद कार्यालयातून व्हावा, अशा मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बुधवारी (दि. ३१) रोजी शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, दिव्यांग वंचितांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाइंचे जत विधानसभा प्रमुख महादेव हुचगोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र संघटन सचिव संजयराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला जाणार आहे. तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, दिव्यांग व वंचित घटकांतील लोक सहभागी होणार आहेत. अधिक बोलताना ते म्हणाले कृषी विभागातील अधिकारी अरेरावीची भाषा करतात. वेळेवर कामावर हजर नसतात. त्यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करावी, तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामांची चौकशी व्हावी, जत शहरात चौकाचौकांत शौचालये व मुतारीची व्यवस्था करावी, महाराणा प्रताप चौक ते महाराष्ट्र बँकेपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करावे, भूमिअभिलेख कार्यालयातील अनागोंदी थांबवावी, डाळींब, द्राक्ष व इतर पिकांचे अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, दुष्काळग्रस्त स्थिती असल्यामुळे बँका व सोसायटींची कर्जे माफ करावीत, थकीत वीज बिल पूर्णपणे माफ करावे, यांसह इतर मागण्यांसंदर्भात मोर्चा आयोजित केला आहे. सुरुवात जत येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होईल. महाराणा प्रताप चौक, मंगळवार पेठ, लोखंडी पूल, शिवाजी पेठ, तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा जाईल.
Comments
Post a Comment