श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे हे आधुनिक जत संस्थानचे शिल्पकार; आमदार विक्रमदादा सावंत

"रामराव डे" निमित्त महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    श्रीमंत राजे रामराव  महाराज डफळे यांनी जत संस्थानाचा राजकारभार करताना राजेशाहीच्या जोडीला लोकशाही रुजविण्याचा प्रयत्न केला. प्रजेच्या कल्याणासाठी इ.स.1924 मध्येच शैक्षणिक संस्था, सार्वजनिक दवाखाना, नगरपरिषद, स्पोर्ट्स क्लब यासारख्या संस्था स्थापन करुन नव्या क्रांतीला सुरुवात केली, म्हणून श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांना आधुनिक जतचे शिल्पकार म्हणून गौरविले जाते, असे प्रतिपादन आमदार विक्रमदादा सावंत यांनी केले.
     ते राजे रामराव महाविद्यालय,जत येथे सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने जत संस्थानचे भुतपूर्व नरेश श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महाविद्यालयात श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांची पुण्यतिथी "रामराव डे" म्हणून साजरी करण्यात येते. प्रारंभी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या हस्ते त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, तालुका कॉग्रेस अध्यक्ष मा.बाबासाहेब कोडग, रामपूरचे सरपंच मा.मारुती पवार, सेवादल अध्यक्ष मा.मोहन मानेपाटील, माजी मुख्याध्यापक कृष्णा बिसले, माजी प्राचार्य शिवाजीराव बिसले, प्रा.श्रीमंत ठोबरे उपस्थित होते. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ‌.सुरेश पाटील यांनी उपस्थिताचे स्वागत करुन आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.
     यावेळी पुढे बोलताना आमदार विक्रमदादा सावंत म्हणाले की, श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच लोकांना सुविधा पुरविण्यासाठी नगरपालिका स्थापन करुन त्याचा कारभार लोकनियुक्त मंडळाच्या हाती देऊन लोकशाहीची मुल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. श्रीमंत अमृतसिंहराजे डफळे यांनी 1885 मध्ये संस्थानातील मुले शिकली पाहिजेत म्हणून इंग्रजी व मराठी माध्यमामध्ये हायस्कूल सुरु केले आणि श्रीमंत राजे रामराव महाराजांनी या शाळेसाठी जर्मन स्थापत्य कलेचा वापर करुन भव्य इमारत 1926 साली बांधली. आजही हि हायस्कूलची भव्य इमारत शैक्षणिक कार्य करीत दिमाखात उभी आहे. शेतकऱ्यांसाठी तलाव बांधून शेती कर्जाची सोय केली, म्हणून इतिहासामध्ये एक प्रजाहितदक्ष व सुधारणावादी राजा म्हणून श्रीमंत राजे रामराव महाराज  डफळे यांचा गौरव केला जातो, असेही ते शेवटी म्हणाले.
     तसेच यावेळी प्रा.पांडुरंग वाघमोडे यांचे 'जत संस्थांनचे अधिपती श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांचे कार्य' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवराच्या शुभहस्ते शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे व श्रीमंत राजे रामराव महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यानी, श्रीमंत राजे रामराव महाराज व श्रीमंत विजयसिंह राजे डफळे यांच्या उदार दातृत्वातून तेवीस एकर जागेवर उभा राहिलेल्या महाविद्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्रा.कुमार इंगळे यानी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सतीशकुमार पडोळकर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष