महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. विक्रमसिंह सावंत यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला दाखल

 

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
   काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जत विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. विक्रमसिंह सावंत यांनी जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी मार्केट कमेटी जत येथे आ. सावंत यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांनी सभेला संबोधित केले. सभा झाल्यानंतर जत शहरातून भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शहरासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.
    सभेला संबोधित करत असताना माजी मंत्री विश्वजीत कदम म्हणाले की, आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत जत तालुका हा विकासात अग्रेसर ठरला आहे. त्यांनी जत मतदारसंघातील पाणी व इतर प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडून मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. त्यांनी म्हैसाळ, तुबची बबलेश्वरच्या पाण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला आणि जत तालुक्याला पाणी मिळवून दिले. कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारा, जत मतदारसंघाला विकासाच्या बाबतीत पुढे नेणारा कर्तबगार नेता आ. विक्रमसिंहदादा सावंत यांच्या रूपाने लाभला आहे.
    येणाऱ्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी, जत तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनतेने विक्रमदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना पुन्हा एकदा विक्रमी मतांनी निवडून द्यावे. कॉंग्रेस व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विक्रमसिंहदादांच्या विजयासाठी एकदिलाने काम करावे,असे आवाहन केले.
    कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी म्हणाले की आ. सावंत याना यावेळी ५० हजाराच्या फरकाने निवडून द्या, कर्नाटकातून आम्ही तुम्हाला तुबची बाबलेश्वर योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाणी देऊ. कागवाडचे आमदार राजू अण्णा कागे म्हणाले की, आमदार सावंत हे सभागृहात जत तालुक्यातील पाण्यासाठी सतत आपले प्रश्न उपस्थित करत असतात यातूनच जत तालुक्यातील जनतेविषयी असलेली तळमळ दिसून येते त्यामुळे तालुक्यातील जनतेने पुन्हा एकदा जत तालुक्यात काम करण्याची संधी त्यांना द्यावी तसेच डॉ. विश्वजीत कदम यांनी मंत्रिमंडळात मंत्रीपद निवडताना जलसंपदा मंत्रीपद निवडावे व जत तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा.
    सभापती सुजय उर्फ नाना शिंदे म्हणाले की, आमदार सावंत यांच्या प्रचारार्थ प्रत्येक गावामध्ये आम्ही पोहोचलो आहोत या ठिकाणी बोलत असताना मी जास्त काही बोलणार नाही परंतु पुढे कोण बोलले तर त्याला सोडणार नाही. कोणीही आम्हाला कमजोर समजू नये आमची ताकद काय असेल तर 'बोलणे कमी व कामाची हमी' ही आमची ताकद असल्याचे त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.
    यावेळी विवेक कोकरे व महादेव पाटील यांनी धनगर समाजाला दिशाभूल करणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून द्यावी. तालुक्यात आयात उमेदवार चालणार नाही. तालुक्याचा विकास करणारे व तालुक्याची माहिती असणारे आ. सावंत यांना मोठया मताधिक्याने निवडून अणु अशी ग्वाही दिली. तसेच शिवसेना उबाठाच्या वतीने शिवाजी पडळकर यांनी आमदार विक्रमसिंह सावंत यांना पूर्णपणे पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
    यावेळी तालुका काँग्रेसचे ता.अध्यक्ष बाबासाहेब कोडग, आप्पाराय बिराजदार, भूपेंद्र कांबळे, संजयकुमार सावंत, मोहन मानेपाटील, माजी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेणावर, वर्षाताई सावंत, समाधान शिंदे यांच्यासह कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नामनिर्देश अर्ज दाखल केल्यानंतर आ.सावंत म्हणाले की, प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आज अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी तालुक्यातील मतदारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. येणाऱ्या काळात जत विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या विचाराचा राहील हे जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. यावेळी खा विशाल पाटील उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष