स्पर्धेतून खेळ व सांघिक खिलाडू भावना जिंकायला हवी; प्राचार्य डॉ.सुरेश पाटील
राजे रामराव महाविद्यालय जत येथे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सांगली व राजे रामराव महाविद्यालय,जत यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी राम फरकांडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अन्सार शेख, माजी क्रीडा शिक्षक प्रा. सिद्राम चव्हाण यांच्या हस्ते व राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. मैदान पूजनाने या स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी स्पर्धेसाठी उपस्थित खेळाडू व संघ व्यवस्थापकांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, स्पर्धा म्हणजे यश अपयश नव्हे तर स्पर्धा म्हणजे लढण्याची जिद्द असते. ही जिद्द उरात बाळगून आपण सर्व स्पर्धक उत्सवात सहभागी झालेले आहात. या स्पर्धेतून खेळ व सांघिक खिलाडू भावनाच विजयी झाली पाहिजे असे सांगून त्यांनी राजे रामराव महाविद्यालयाची क्रीडा परंपरा सांगून शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील नव्हे तर राज्यातील एक प्रमुख महाविद्यालय असून आज जवळ जवळ पंचवीस ते तीस विद्यार्थी तालुका व जिल्हाक्रीडाधिकारी महाराष्ट्राच्या विविध भागांत कार्यरत आहेत, असेही ते शेवटी म्हणाले.
नॅक नामांकनात अभूतपूर्व यश मिळविल्याबद्दल विशेष सत्कार:
याप्रसंगी जत तालुका क्रीडा शिक्षक संघाच्या वतीने जत तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महम्मदहुसेन शेख, जत तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन चव्हाण, विजय बिराजदार, जत तालुका क्रीडाशिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय काटे, संघटनेचे अझरुद्दीन शेख, महादेव सवाई सर्जे, नामदेव बेळ्ळे, स्वप्निल सुर्वे, नंदकुमार गुरव, रवींद्र व्यवहारे, मुस्ताक गवंडी, संतोष पाटील आदींच्या वतीने राजे रामराव महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनामध्ये A नामांकन मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.सतीशकुमार पडोळकर यांनी तर आभारप्रदर्शन क्रीडा स्पर्धेचे संयोजक प्रा.दीपक कांबळे यांनी केले. स्पर्धेचे संयोजनसाठी प्रा.अनुप मुळे यांचे सहकार्य लाभले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी राजे रामराव महाविद्यालयाचे माजी क्रीडा प्राध्यापक प्रा.सिद्राम चव्हाण व तालुक्यातील क्रीडा शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment