तुकाराम बाबांनी जपला गाडगेबाबांचा सामाजिक वारसा- मंगेश चिवटे | निसर्गरंग साहित्य संमेलनाला प्रतिसाद
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-
समाजामध्ये वावरताना स्वतःचा स्वार्थ पाहणारे अनेक बाबा अनुभवले पण चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज त्याला अपवाद आहेत. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून दुष्काळ, कोरोना, महापूर असो की तुकाराम बाबांचा पाण्यासाठीचा लढा कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या सामाजिक विचारांचा वारसा तुकाराम बाबांनी जोपासला याचा आम्हाला अभिमान वाटतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले.
जत येथे सांगली येथील निसर्ग फौंडेशनच्या वतीने सांस्कृतिक नगरी सांगली ते विठ्ठल नगरी पंढरपूरपर्यंत, निसर्गराया भेटूया... चला, विठ्ठल पेरूया... असा एक सायकल प्रवास, निसर्गवारी दोन ते सहा जुलै दरम्यान आयोजित केली आहे. या पर्यावरण संरक्षण संवर्धन वारीमध्ये जतमध्ये संमेलन तसेच शेगाव, बनाळी, अचकनहळळी येथे साधारण एक हजार वृक्षारोपण तसेच पंढरीच्या मार्गावरून जाताना एक लाख बियांचे रोपण करण्यात येणार आले. त्यानिमित्त जत येथील साई प्रकाश मंगल कार्यालयात निसर्गरंग साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. त्यावेळी मंगेश चिवटे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी संमेलनाध्यक्ष तथा नाटककार व पंचमहात्वाचे गाढे अभ्यासक राजेंद्र पोळ, कवी संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आबा पाटील, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू, संमेलनाचे स्वागताध्यक्ष चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकारामबाबा महाराज, सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे, शेखर रणखांबे, महावीर साबन्नावर, वीरधवल पाटील, निशांत घाटगे, पार्थ घाटगे, निसर्ग फौंडेशनचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे आदी उपस्थित होते.
मंगेश चिवटे यांनी पंढरीच्या वारीत निसर्ग जोपासण्याचे काम मागील नऊ वर्षांपासून निर्सग फौंडेशनची टीम करत असल्याबाबत त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला स्वगाताध्यक्ष म्हणून तुकाराम बाबा यांनी केलेल्या नेटक्या नियोजनाबद्दल व सहकार्याबद्दल कौतुक केले.
यावेळी बोलताना राजेंद्र पोळ यांनी पंचमहात्त्वाचे महत्व विषद करून आजच्या होणाऱ्या घडामोडींवर आपले मत व्यक्त केले. कुलदीप देवकुळे यांनी निर्सग फौंडेशनचे आतापर्यत केलेले कार्य सांगितले. कवी आबा पाटील, सभापती सुजयनाना शिंदे, प्रदीप माने-पाटील यांनीही जतमध्ये होत असलेल्या संमेलनाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना हभप तुकाराम बाबा म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन जर व्यवस्थित ठेवायचे असेल तर निसर्ग जोपासणे काळाची गरज आहे. हाच संदेश जत तालुक्यात जावा व निसर्गप्रेमी मंडळी एकत्र यावेत यासाठी जतमध्ये हे संमेलन, वृक्षारोपण मोहीम हाती घेतल्याचे आवर्जून सांगितले. मंगेश चिवटे यांच्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
Comments
Post a Comment