राम,कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण हरी च्या गजरात कणबर्गी जि.बेळगाव येथील दिंडीचे जत शहरातील राम रहिम चौकात जोरदार स्वागत



जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    कणबर्गी जि.बेळगाव येथील वारकरी दिंडी ही दरवर्षी जत शहरात एक दिवस मुक्काम करून पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होते. कणबर्गी येथून ही दिंडी सोमवार दि.२३ जून २०२५  रोजी निघाली असून १८० कि.मी.प्रवास करून ही दिंडी शुक्रवार दि.४ जुलै रोजी पंढरपूरला पोहचणार आहे.
    यावर्षी पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी म्हणून ही वारक-यांची दिंडी जत शहरात दाखल झाली. कणबर्गी येथून निघणा-या या दिंडीचे हे सव्विसावे वर्ष असून यावर्षी या दिंडीत दिडशे महिला व पुरूष वारकरी सहभागी झाले होते. या दिंडीतील खास आकर्षण म्हणजे दिंडीमध्ये बैलाचा रथ व त्यामधील श्री.विठ्ठल, रूक्मीणी व श्री.ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा व पादुका असल्याने ही दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. दिंडीचा रथ फुलानी व विध्दूत रोषणाईने सजविला होता.
   दिंडी चालक आप्पाजी महाराज सुंठकर यांनी या दिंडीचे नेटके नियोजन केले आहे. दिंडीप्रमुख ह.भ.प.आप्पाजी सुंठकर महाराज,.सचिव ह.भ.प.धोंडीबा मुतगेकर महाराज, मारूती मुचंडीकर, अप्पय्या गोयेकर, कल्लाप्पा सुंठकर, लक्ष्मी उचगांवकर,रूक्मीणी मलाई, पार्वती अष्टेकर आदी प्रमुख मंडळीसह दिडशे वारकरी सहभागी झाले आहेत. सर्वच वारकरी हे राम ,कृष्ण,हरी जय जय राम, कृष्ण, हरी चा गजर करीत होते. व टाळमृदुंगाच्या तालावर बेभान होऊन नाचत होते.
    हि दिंड जत शहरातील राम रहिम चौकात आल्यानंतर प्रताप मित्र मंडळाच्या सदस्यानी व स्थानिक महिला भगिनीनी या दिंडीचे दिंडी मार्गावर भव्य अशी रांगोळी काढून तसेच फुलांच्या पाकळ्या पसरून तसेच फुलांची उधळण व फटाक्यांची जोरदार अतिषबाजीकरीत दिंडीचे जोरदार स्वागत केले.
    प्रताप मित्र मंडळाने  गेली एकवीस वर्षे पंढरपूरला जाणा-या या दिंडीच्या प्रसादाची व्यवस्था मकानदार गल्ली,राम रहिम चौकात केली होती  तर  त्यांच्या राहाण्याची व्यवस्था येथिल जि.प.प्रा म.माॅडेल शाळा नं.१ या ठिकाणी केली  होती. या मध्ये येथील हिंदू- मुस्लीम पुरूष व महीला सहभागी होऊन दिंडीमध्ये फेर धरला व राम,कृष्ण, हरी जय जय राम, कृष्ण हरी चा गजर केला. तर महाप्रसादाची व्यवस्था प्रताप मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात आली. दुसरे दिवशी सकाळचा अल्पोपहार हा जि.प.मराठी माॅडेल शाळा नं.१ चे मुख्याध्यापक संभाजी कोडग व परिवाराच्यावतीने व आप्पासाहेब माळी परिवाराच्यावतीने वारक-यांना देण्यात आला त्यानंतर ही पालखी पुढे पंढरीकडे मार्गस्थ झाली.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन