जत शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे देतायेत मृत्यूला आमंत्रण?
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचे खड्डे मृत्युला आमंत्रण देणारे ठरत आहेत. शहरातून जाणा-या या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने व या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने या मार्गावरून ये-जा करणा-या वाहनचालकांचा जिव धोक्यात आल्याने जत नगरपरिषदेने त्वरीत हे खड्डे मुजवावेत अशी मागणी वाहनधारक व शहरवासियांकडून करण्यात येत आहे.
या बाबत सविस्तर माहीती अशी कि, जत शहरातून जाणारा इस्लामपूर- चडचण हा राष्ट्रीय मार्ग असून एक दिड वर्षापूर्वी महामार्ग प्राधिकरणाने जत शहरातून जाणा-या या रस्त्याचे डांबरिकरण केले होते. परंतु सद्या हे डांबरिकरण खराब झाले असून छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून वाहन चालवितांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
खड्ड्यात पाणी भरल्याने एखादा मौठा अपघात होण्याची शक्यता असल्याने हे खड्डे ताबडतोब मुजविणे गरजेचे आहे. तसेच या मार्गावर इतरत्रही खड्डे पडले असल्याने हे खड्डे त्वरीत मुजवावेत अशी मागणीही वाहन चालकांबरोबरच शहरवासियांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment