भारतरत्न डॉ.एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस शाश्वत शेतीदिन म्हणून साजरा
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व जत तालुका कृषि पदवीधर औद्योगिक व कृषि पूरक सेवा सह. संस्था मर्या. जत यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस ७ ऑगस्ट हा तालुकास्तरीय "शाश्वत शेतीदिन" कार्यक्रम म्हणून तालुका कृषि अधिकारी कार्यालय जत येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे अध्यक्ष गणेश माळी यांनी डॉ एम.एस. स्वामिनाथन यांची ओळख व कृषि क्षेत्रातील त्यांचे भरीव योगदान व शाश्वत शेती याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी तालुका कृषि अधिकारी प्रदिप कदम यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती तसेच कृषि विभागाच्या विविध योजना याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या शाश्वत शेतीदिन कार्यक्रमात मिथिलेश मालानी, श्रीमती. गितांजली शिंदे व रोहित प्रधाने या प्रयोगशील शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शेती क्षेत्रातील कार्याचा आढावा घेऊन त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रविकिरण पवार यांनी केले. सुत्रसंचालन व आभार सहाय्यक कृषि अधिकारी एल एम कांबळे यांनी केले. या कार्यकमास मंडळ कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, सहाय्यक कृषि अधिकारी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषि सखी व जत तालुक्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
Comments
Post a Comment