जत घाटगेवाडी रस्त्याची दुरावस्था; अपघात झाल्यास जबाबदारी कोण?
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-
जत शहरातून जाणाऱ्या जत- घाटगेवाडी रस्त्याची अत्यंत वाईट दुरावस्था झाली असून रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कुंभार यांनी उपस्थित केला आहे.
जत ते घाटगेवाडी या रस्त्याची अत्यंत खराब अशी अवस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे आपणहून अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच झाले आहे. या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याच्या दोन्ही बाजू खचल्या आहेत. विशेषत: श्रावण महिन्यात या रस्त्यावरून मोठी वर्दळ सुरू असते. श्री क्षेत्र गविसिध्देश्वर देवस्थानकडे जाण्यासाठी हजारो भाविकभक्त या रस्त्याचाच वापर करतात. दुधाळवस्ती इथपर्यंतच डांबरीकरण करण्यात आला असून तेथून पुढे घाटगेवाडी गावापर्यंत वाहनचालकांना रस्त्यावरून ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच रस्त्यालगत मोठी नागरी वस्ती आहे.
जत पासून घाटगेवाडी हे अंतर सात कि.मी.असून या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. यापूर्वी हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने व रस्त्यावरील डांबरीकरण निघून रस्ता वाहतूकी अयोग्य झाल्याने या रस्त्यावरूण. ये-जा करणा-या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्याचे जत अथणी मार्गावरील गणपती मंदिर ते दुधाळवस्ती येथपर्यंत चे डांबरीकरण कामास मंजूरी मिळून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु दुधाळवस्ती ते घाटगेवाडी गावापर्यंत चे पाच कि.मी.चे डांबरीकरण काम मंजूर नसल्याने तसेच या कामामध्ये स्थानिक पुढारी राजकारण करित असल्याने हे काम झाले नाही.
तरी प्रशासनाने त्वरीत दुधाळवस्ती ते घाटगेवाडी या रस्त्याचे डांबरीकरण काम मंजूर करून काम पूर्ण करावे अन्यथा तिव्र आंदोलन करू असा ईशारा कुंभार यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment