निर्भया पथकाकडून सिद्धार्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत येथील सिद्धार्थ पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा, गुन्हेगारी प्रतिबंधक उपाय आणि आत्मसंरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी निर्भया पथक यांचेकडून प्रभावी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हे सत्र सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळच्या अध्यक्षा डॉ. वैशाली सनमडीकर , व सचिव डॉ. कैलास सनमडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. शाळा समितीचे अध्यक्ष भारत साबळे सर यांचे मोलाचे सहकार्य आणि पाठिंबा याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य के. श्यामसुंदर सर यांचे प्रेरणादायी नेतृत्व महत्त्वाचे ठरले.
या सत्राचे आयोजन संस्कृतिक प्रमुख सौ. सरिता पंडित यांनी केले, तसेच शैक्षणिक समन्वयक सौ. रंजना शिंदे शिक्षक नागेश खजिरे, सौ. वर्षा पाटील आणि आयटी विभाग प्रमुख सौ. झीनत नाईक यांचेही सक्रिय सहकार्य लाभले. सत्रात अधिकारी समीर मुल्ला, यांनी सौ. पार्वती चौगुले आणि अजित मदने यांनी विद्यार्थ्यांना १०९८ (छेडछाड, पाठलाग), १०९१ (निर्भया पथक) आणि ११२ (मारामारी, आपत्कालीन परिस्थिती) या हेल्पलाइन क्रमांकांचा योग्य वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले व खोटे कॉल न करण्याचा इशारा दिला. ब्लॅकमेलिंग, अश्लील रेकॉर्डिंग आणि लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'निर्भया पथक' ची स्थापना केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थिनींना सोशल मीडियाचा अयोग्य वापर टाळावा, कोणावरही अंधविश्वास ठेवू नये आणि पॅशन क्लासेसपेक्षा आत्मसंरक्षण (कराटे) प्रशिक्षणास प्राधान्य द्यावे, असे सांगण्यात आले. छेडछाड झाल्यास स्वतः चे संरक्षण कसे करावे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही देण्यात आले. उदाहरणार्थ, करनगळीचा वापर करून कानामागे मारल्यास हल्लेखोरापासून स्वतःचे संरक्षण करता येते. 'पोलीस काका पोलीस दीदी' उपक्रमाची माहिती देण्यात आली, ज्याअंतर्गत पोलीस अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये विद्यार्थ्यांसोबत प्रवास करत सुरक्षिततेची खात्री करतील. प्राचार्य श्यामसुंदर सर यांनी विद्यार्थ्यांना विनयभंग, त्रास, किंवा अडचणी असल्यास शाळेच्या सूचना पेटीत तक्रार लेखी स्वरूपात टाकावी असे आवाहन केले. या सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता, आत्मविश्वास आणि आत्मसंरक्षणाची प्रेरणा निर्माण झाली.
Comments
Post a Comment