सक्तीच्या वर्गणी वसुली बाबत जत व्यापारी असोसिएशनची निषेध रॅली | पोलिसात तक्रार द्या कारवाई करू; पीआय कोळेकर


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत शहरात वर्गणीच्या नावावर व्यापा-यांना धमकावून व शिवीगाळ करून वर्गणी गोळा करणा-यांवर पोलीस प्रशासनाने त्वरीत बंदोबस्त करावा या मागणीसाठी शहरातील व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद ठेवून संतप्त व्यापारीवर्ग रस्त्यावर उतरून शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी कारवाई न केल्यास बेमुदत व्यापार बंद ठेवण्याचा इशारा व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार द्या आम्ही त्यांच्यावर नक्कीच कारवाई करू असे सांगितले.
     जत येथील व्यवसाईकांकडून विविध वर्गणीच्या नावाखाली काही गावगुंड हजारो रूपयांची वर्गंणी वसूल करित असून वर्गणी न देणा-या व्यवसाईकांना धमकावणे व शिवीगाळ करणे या प्रकारामुळे व्यापारीवर्ग दहशतीखाली आहे. त्यातच ऑनलाईन व्यवसायांमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यातच गणेशोत्सव तोंडावर आल्याने शहरातील विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधीकारी व कार्यकर्ते हे वर्गणीसाठी बाजारपेठेत फिरून व्यापा-यांकडून वर्गणी गोळा करू लागले आहेत. याचाच फायदा घेऊन काही हप्तेखोर टोळ्या वर्गणीच्या नावाखाली व्यापा-यांकडे पैसे मागू लागले आहेत. जे व्यापारी या गावगुंडाना पैसे देत नाहीत त्या व्यापा-यांना धमकावने त्यांना मारहाण करणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत. 
     मागील आठवड्यात जत शहरातील व्यापा-यांना धमकावून वर्गणी गोळा करित असताना व्यापा-यांनी वर्गणी देण्यास नकार दिल्याने त्या व्यापा-यांना मारहाण करण्याच्या घटनाही घडल्या आहेत.  जत पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना व्यापा-यांवर अन्याय होत असतानाही ते कारवाई का करित नाहीत असा सवाल व्यक्त करित व्यापा-यांनी जत बाजारपेठेतील पोलीस चौकीचा प्रश्न मार्गी लावून शहरातील प्रमुख चौकात व बाजारपेठेत सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची मागणी केली.
     याच पाश्र्वभूमीवर वर्गणीच्या नावावर व्यापा-यांना धमकावून त्यांना मारहाण करणा-या हप्तेखोरांवर पोलीसांनी ताबडतोब कारवाई करावी या मागणींसाठी आज जत व्यापारी असोसिएशन ने व्यापार बंद ठेवला होता. त्याला सर्व व्यापा-यांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून पाठींबा दिला.
     यावेळी व्यापारी असोसिएशन जत चे अध्यक्ष किरण बिज्जरगी, अर्जुन सवदे, सदाशिव जाधव, बाळासाहेब हुंचाळकर, प्रज्वल साळे आदींनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
     या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार पक्षाचे  नेते माजी सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेशराव शिंदेसरकार, सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, संग्राम जगताप, भाजप नेते आण्णा भिसे, आरपीआय महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, गौतम ऐवळे आदीनी उपस्थित राहून आपला पाठींबा जाहीर केला.
     या बंद व आंदोलना दरम्यान संतप्त व्यापारी रस्त्यावर आल्याने जवळ जवळ अर्धातास रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होऊनही या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी हजर नसल्याने व्यापा-यांनी पोलीस प्रशासनाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या.

जत शहरातील काही मंडळांचे कार्यकर्ते हे वर्गणी गोळा करण्यासाठी शहरातून फिरत असतात. यावेळी जर एखाद्या व्यापाऱ्यांनी त्यांना वर्गणी देण्यास नकार दिला, तर त्याला धमकावणे व शिवीगाळ करणे असे प्रकार घडत असून. याला जत शहरातील काही प्रभागातील नेतेमंडळी पाठबळ देत असल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

"एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" राजे रामराव महाविद्यालयात नवोपक्रम|प्राध्यापक विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण