जत येथील सिद्धार्थ पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम
जतवार्ता न्यूज नेटवर्क :
सिद्धार्थ पॉलिटेक्निक जत येथे डिप्लोमा प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक १० सप्टेंबर रोजी कार्यपरिचय उपक्रम (इंडक्शन प्रोग्राम) उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी परिचित करून देणे, शैक्षणिक उपक्रमांची माहिती देणे व आत्मविश्वास निर्माण करणे हा होता.
महावितरण महामंडळाचे अधिकारी किशोर वाघ यांच्या उपस्थित दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य सौ. रेणुका वाघोली यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून अभ्यासाबरोबरच सहशालेय उपक्रम, व्यक्तिमत्व विकास व नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, प्रयोगशाळा सुविधा, उद्योग सहली व प्रकल्प कार्य याबाबत मार्गदर्शन केले. वरिष्ठ प्राध्यापकांनी शिस्त, करिअर मार्गदर्शन आणि संधींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत नवीन शैक्षणिक प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थिनीने केले, तर आभार प्रदर्शन इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रकाश कारकल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी विभाग प्रमुख प्रकाश कारकल, हरीश साळुंखे, करण रजपूत, इरापा पुजारी, सौरभ शिंदे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. संस्थेच्या चेअरमन डॉ. वैशाली सनमडीकर, भारत साबळे, व्हा. चेअरमन विशाल जाधव व सचिव डॉ. कैलास सनमडीकर यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment