विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगण विकास हा राष्ट्रीय सेवा योजनेचा मूळ उद्देश; चंद्रसेन माने-पाटील
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
राष्ट्रीय सेवा योजनेमुळे आत्मविश्वास वाढीस लागून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हा राष्ट्रीय सेवा योजनेचा मूळ गाभा आहे, असे प्रतिपादन माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.चंद्रसेन मानेपाटील यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात "राष्ट्रीय सेवा योजना व आजचा युवक" या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव करेनव्वर हे होते. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ.पुंडलिक चौधरी, कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका महेजबीन मुजावर, व प्रकल्प अधिकारी प्रा.सोमनाथ गायकवाड उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पुंडलिक चौधरी यांनी आपल्या प्रस्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे महत्त्व सांगून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना चंद्रसेन मानेपाटील पुढे म्हणाले की, काळानुसार व्यक्तिमत्वामध्ये, विचारांमध्ये बदल होत असतो. हा बदल स्वीकारून जे काही करायचे आहे ते मनापासून करा. दुसऱ्याला चांगले वाटले पाहिजे त्यापेक्षा स्वतःच्या मनाला चांगले वाटले पाहिजे ही शिकवण राष्ट्रीय सेवा योजना देते, असे सांगून ते पुढे म्हणाले की, विविध समाज माध्यमांमध्ये तुम्हाला प्रचंड ज्ञान, माहिती मिळेल पण संस्कार मिळणार नाहीत. म्हणून योग्य संस्कारासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमामध्ये सहभागी झाले पाहिजे. विविध उपक्रमात सहभागी झाल्यास विविध कौशल्ये विकसित होतात. आपल्याकडे कौशल्य असतील तर जगात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत असेही ते शेवटी म्हणाले.
प्रारंभिक शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.सलीम पठाण यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य प्रा.धनंजय वाघमोडे यांनी तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.सोमनाथ गायकवाड यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment