जत शहरात कॉंग्रेसला बळकटी; भाजप, राष्ट्रवादीच्या दिग्गजांसह अनेकांचा कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत शहराच्या राजकारणात रोज नवनवीन उलथापालथ होत आल्याचे दिसून येत आहे. जतच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना आज घडली. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षांतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी व शहरातील प्रभावी युवा नेतृत्वाने माजी आमदार  विक्रमसिंह सावंत यांच्या समर्थ नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. दोन विद्यमान नगरसेवकांसह विविध पक्षांच्या प्रभावी कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे हाती घेतलेले निशाण, आगामी जत नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने कॉंग्रेस पक्षासाठी शुभ संकेत मानले जात आहेत.
     आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे जत शहरात कॉंग्रेस पक्षाची ताकद गगनाला भिडल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपचे विद्यमान नगरसेवक प्रकाश माने आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका जयश्री ताई शिंदे यांचा समावेश आहे, ज्यामुळे विरोधी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
     याव्यतिरिक्त, राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षातील सलीम नदाफ (टपाले) दस्तगीर नदाफ (टपाले )यांनीही कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. रामराव नगर येथील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अनिल शिंदे, प्रमोद चव्हाण, अरबाज शेख, राजू नगारशी आणि जमीर अत्तार यांनीही आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने, शहराच्या विविध भागांत कॉंग्रेस पक्षाची पकड मजबूत झाली आहे.
     सोहळ्यादरम्यान प्रवेश करणाऱ्या सर्वांचे माजी आमदार सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी जतच्या विकासाच्या ध्येयावर भर दिला. सावंत म्हणाले, “जत शहराच्या विकासासाठी आता सर्वसमावेशक आणि भक्कम नेतृत्वाची अत्यंत गरज आहे. शहरातील प्रमुख नेत्यांनी आणि युवाशक्तीने आज माझ्या नेतृत्वावर आणि कॉंग्रेस पक्षाच्या धोरणांवर जो विश्वास दाखवला आहे, तो केवळ राजकीय प्रवेश नसून, जतच्या जनतेचा विश्वास जिंकण्याच्या दिशेने टाकलेले हे एक मोठे आणि निर्णायक पाऊल आहे. या सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने आपण शहराचा विकास निश्चितच साधू.”
या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आप्पाराया बिरादार, सभापती सुजय नाना शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, रामचंद्र सरगर तसेच कॉंग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    - दोन विद्यमान नगरसेवकांसह शहरातील प्रभावी युवा नेतृत्वाच्या कॉंग्रेसमधील प्रवेशामुळे आगामी जत नगरपरिषद निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढल्याचे स्पष्ट चित्र आहे. शहरातील राजकीय समिकरणे बदलली असून, यामुळे कॉंग्रेसला एक मोठी आणि नवी ऊर्जा मिळाली आहे. शहरात कॉंग्रेस पक्षाविषयी निर्माण झालेल्या या सकारात्मक वातावरणाला या प्रवेशामुळे अधिक गती मिळाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांतून आणि राजकीय विश्लेषकांतून उमटत आहे. कॉंग्रेस पक्षाच्या वाढलेल्या ताकदीमुळे निवडणुकीतील चुरस अधिक वाढणार असल्याचे दिसते.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

"एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" राजे रामराव महाविद्यालयात नवोपक्रम|प्राध्यापक विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण